आरक्षण
काल मराठा समाजाने आरक्षणासाठी महाराष्ट्र बंद केला. महार मांगासकट साळी, माळी, तेली, तांबोळी, कुणबी, भंडारी सगळेच टेंशनमध्ये आले. पण बौध्द समाज मात्र एकदम स्थितप्रद्न्य. आणि नुसताच स्थितप्रद्न्य नव्हे तर रिझर्व्हेशनच्या मुद्द्यावर या समाजाने मराठा समाजाला मनापासून भरभरुन पाठिंबाही देऊन टाकला. नुकतीच एक बातमी वाचनात आली. बिडमधल्या एका छोटाश्या ग्रामपंचायतीच्या सदस्या शालन नितिन धुताडमल या बाईने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आपल्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला. आणि महत्वाचं म्हणजे या बाई बौध्द आहेत. ही साधी घटना नाही मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजिनामा देणारी ही पहिली महिला आहे. एवढं शहाणपण या बौध्द समुहाला आलं कुठून? मला वाटतं या बौध्द समाजाला हे शहाणपण बाबासाहेबांनी दिलं आहे. १४ आक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी या समाजाला बुध्दांसोबत हे शहाणपणही दिलं. किंबहुना बुध्द म्हणजेच शहाणपण, असं जर मी म्हटलं तर ते वावगं ठरु नये. आमच्या वाट्याच्या सवलती मराठा समाजाला देऊन टाका, असं विधान यदाकदाचित भविष्यात जर या बौध्द समाजाकडून आलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. कारण आपली प्रगती ही रिझर्व्हेशनमुळे झाली नसून ती प्रगती बौध्द धम्मामुळे झाली आहे, हे या बौध्दांना चांगलं माहित आहे. १४ आक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांना साक्ष ठेऊन जे बौध्द झाले ते शहाणे तर झालेच पण एक अपूर्व धाडस बाबासाहेबांनी यांच्या धमन्यांमध्ये पेरलं असावे. त्या काळात एका क्षणात घरातले तेहतीस कोटी देव घराच्या बाहेर फेकून देणं म्हणजे खाऊ नाही. त्यासाठी वाघाचं काळीज हवं. बाबासाहेबांच्या एका आदेशासरशी हे देव बाहेर फेकून ही माणसे बौध्द झाली. नाहितर रांग लावून गणपतीला दुध पाजणारे आणि द्वारकामाईच्या भिंतीत साईबाबा प्रकट झाल्याची अफवा पसरताच हजारो मेंढरं तिथे गर्दी करताना आपण शिर्डीत पाहिलच आहे.
अशा धाडसी प्रबुध्द परंपरेची एकविसाव्या शतकातली तिसरी पिढी काय करते आहे? कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं की एक भिषण वास्तव समोर येतं. स्वातंत्र्योत्तर काळातलं हे भिषण वास्तव असं आहे की, सध्याच्या रिझर्व्हेशनच्या बाबतीत बोलायचं झालच तर, अनुसुचित जातीच्या तेरा टक्क्यामध्ये बौध्दांसकट ५९ जाती आहेत.अनुसुचित जमातीच्या सात टक्क्यामध्ये ४७ जाती आहेत आणि भटक्या विमुक्तांच्या अकरा टक्क्यामध्ये ५६ जाती आहेत. या १६२ जातींना आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालय हे वेगळ सांगायची गरज नाही. या सगळ्या जाती येथेच्छपणे या सवलती उपभोगतात पण ह्यांना बाबासाहेबांशी व त्यांच्या रिपब्लिकन पक्षाशी काहीही देणे घेणे नाही. पण या १६२ जातींच्या आरक्षणासाठी व त्यांच्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी निळा झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्त्यावर उतरुन लढतो तो फक्त बौध्दच. आणि हे सगळे सवलतीपात्र दलित, भटके विमुक्त मस्तपैकी सवलती उपभोगून सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे खांद्यावर घेऊन बौध्दांनाच टार्गेट करण्यात मश्गूल आहेत. ओबिसींबाबतही परिस्थिती तशीच. या ओबिसींना रिझर्व्हेशनही बाबासाहेबांनी संविधानात अंतर्भूत केलेल्या प्रावधाना मुळेच मिळाले आहे. हे प्रावधान नसते तर मंडल आयोगही गठित झाला नसता. हा मंडल आयोग अमलात यावा म्हणून सर्वप्रथम रस्त्यावर उतरला तो बौध्दच. आणि आज स्वत:ला ओबिसीचे मसिहा म्हणविणारे त्यावेळी दलितांमुळे अपवित्र झालेला हुतात्मा स्मारक शुध्द करण्यासाठी गोमुत्र शिंपडण्यात व्यस्त होते. म्हणजे दलितांसाठी, ओबिसींसाठी लढणारे बौध्द, अनिसमध्ये शाम मानव व दाभोळकरांच्या पाठीशी उभे राहणारे बौध्द, कम्युनिष्टांची डफडी वाजवणारे बौध्द, आरपिआय(ए) मध्ये बौध्द, पिपल्स रिपब्लिकनमध्ये बौध्द, भारिपमध्ये बौध्द, बसपामध्ये बौध्द, बिआरएसपीमध्ये बौध्द इतकच नव्हे तर वामन मेश्रामच्या भारत मुक्ती मोर्च्यामध्ये सुध्दा बौध्दच.
मग बौध्दांच्या पाठी कोण? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर, 'कोणीच नाही.' असे आहे. बौध्दाचा नेता कोण? या प्रश्नाचे उत्तरही, 'कोणीच नाही.' असे आहे. तुम्ही म्हणाल की, बौध्दांचे नेते प्रकाश आंबेडकर आहेत. पण मला मात्र हे मान्य नाही. कारण प्रकाश आंबेडकर तर बहुजनांचे, वंचितांचे नेते आहेत. आणि 'बौध्द' बहुजनही नाहित व वंचितही नाहित. तिच गत आठवले व कवाडेंची. केवळ बौध्दांचे नेते म्हटले तर राष्ट्रिय नेता होता येत नाही. त्यामुळे एक बाब स्पष्ट आहे की, बौध्दांना नेताच नाही. आणि खरं सांगायचं तर बौध्दांना नेत्याची गरजच नाही. कारण बौध्द हा इतका इंटलेक्च्युअल, इतका प्रगल्भ आहे की एक बाबासाहेब सोडले तर त्याला इतर कुणाला नेता मानायची गरजच नाही. म्हणूनच मी सुरवातीला म्हटल्याप्रमाणे १९५६ साली बाबासाहेबांनी आम्हाला नुसताच बुध्द दिला नाही तर एक शहाणपणही दिलं. आणि शहाण्या माणसांना नेत्याची गरज नसते. याच शहाण्या माणसांना मी 'माझी माणसे समजतो. या माझ्या माणसांविषयी मी आज बोलणार आहे.
यावर मला कोणी जातीयवादी वा संकुचित ठरविण्याची शक्यता आहे. पण मला मात्र तसे अजिबात वाटत नाही. जो, जो बौध्द आहे, मग तो चर्मकारातून आलेला आकाश सोनावणे असो, मातंगातून आलेले विठ्ठलदादा उमप असो किंवा ब्राह्मणातून आलेले भालेराव असो. या सगळ्यांना मी माझी माणसे समजतो. कारण बौध्द होणे म्हणजे केवळ धर्म बदलणे, दिक्षा घेणे किंवा नमो तस्स म्हणणे, असे मी समजत नाही. बौध्द होणे म्हणजे डोळस होणे, प्रगल्भ होणे, बुध्दिमान होणे आणि परिपूर्ण शहाणे होणे. बौध्द होणे म्हणजे साक्षात विद्रोही होणे. म्हणून तर बौध्द झालेला पुण्यातला आमचा आकाश उर्फ अप्पा सोनावणे आपल्या मुलीचे लग्न संविधानाला साक्ष ठेऊन करतो आणि आपल्या मुलाचे नाव 'इंडियन' ठेवतो. ही धमक फक्त बौध्दातच असू शकते.
ref - https://m.facebook.com/groups/12554026396?view=permalink&id=10156419906176397


0 टिप्पणियाँ:
एक टिप्पणी भेजें
सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]
<< मुख्यपृष्ठ